Wednesday, January 18, 2012

आठवणीतली संक्रांत


 
बालपणीचा काळ सुखाचा...खरं आहे हे.....नुकतीच आलेली संक्रांत मला दरवर्षी प्रमाणे बालपणाच्या आठवणीत घेऊन गेली.....आमच्या नाशिकला संक्रांत किती उत्साहात साजरी व्हायची .....सगळीकडे नुसता "गयी SSSSS  बोला SSS" चाच गजर असायचा ....कालानुरूप तिथेही बदल झाले... पण माझ्या मनात मात्र माझ्या लहानपणी साजरी व्हायची तशीच संक्रांत घर करून बसली आहे.

आमचे कुटुंब म्हणजे आई, नाना , आम्ही तिघी बहिणी आणि आमचा एकुलता एक भाऊ. त्याला भाऊ नसल्याच त्याचा दुख संक्रांतीला नेहेमी उफाळून यायचं.कारण कॉलनितल्या इतर मुलांचे धाकटे भाऊ त्यांची फिरकी पकडायचे आणि दादाला कोणीच नसायचं.त्यात दोघी बहिणी मोठ्या म्हणून त्या नाही. राहिले मी.माझ्यात आणि दादात ९ वर्षांचे अंतर त्यामुळे त्याची दादागिरी फक्त माझ्यावरच चालायची. सकाळ झाली कि लवकर अंघोळ करून दादा पहिले गच्चीवर पाळायचा.आमच्या बिल्डिंग मधला आणखीन एक मुलगा होता अमेय, ज्याला भाऊ आणि बहिण कोणीच नव्हतं.तो पण सकाळी सकाळी गच्चीवर हजार असायचा.दादाची उंच उंच उडणार पतंग थोडा वेळ का होईना हातात पकडायला मिळेल ह्या आशेने दादा गेला कि थोड्या वेळाने माझी स्वारी पण गच्ची वर जायची. मी सारखा त्याच्या मागे मागे  "दादा दे ना मला हातात पतंग"..  मग तो म्हणायचा "थांब अजून थोडी उंच जाऊदे"...पुन्हा ५, १० मिनिट झाले कि.."ए दादा देना २ मिनिट हातात"....मग तो मला त्याची चक्री पकडायला लावायचा..."थांब आता पेच होणार आहे.....तू बाजूला सरक".....आणि नेमका जर त्यावेळेस आकाशात पेच झालाच तर अमेय धावत धावात येऊन चक्री माझ्याकडून काढून स्वतःच्या हातात घ्यायचा. मग त्या दोघांचा "ढील दे ...ढील दे......खेच......आणखीन सोड....." सगळी आरडओरड सुरु व्हायची.....मग कधी आमची पतंग जायची आणि कधी दुसर्यांची......आमची पतंग गेली कि मांजा जितका मिळेल तितका ओढायचा ...मग मात्र हे दोघं मला मांजा चक्रीला गुंडाळायला बसवायचे.मी पण सगळा मांजा नीट गुंडाळून ठेवायची. मग नव्या पतंगीला मंगळसूत्र बांधायचं काम माझ्याकडे...तरीपण दादा cross  check  करायचाच ...मी नीट भांधालय कि नाही ते.....कधी कधी दुसरी पतंग आमच्या गच्ची वर येऊन पडायची....मग तिचा मांजा पण आम्हाला मिळायचा.....फाटलेली पतंग मिळाली कि तिला repair  करायचं...दादा मला खाली पाठवायचा,आई कडून भात आणायला...मग भाताने पतंगीचा कागद चिकटवून तिला repair करायचा कार्यक्रम व्हायचा......कधी कधी वारयाने सगळ्या पतंगी उडायच्या ..इकडे तिकडे जायच्या...मग हे दोघं मला परत कामाला लावायचे...मी सगळ्या पतंगी एकत्र गोळा करून त्यावर वीट ठेऊन द्यायची...आणि परत दादा मागे उभी रहायची..."दे ना मला पतंग हातात..."..खूप वेळ झाला कि द्यायचा हातात.....दादाची ती उंच उंच जाणार पतंग....उन्हात तिच्याकडे एकटक पाहून डोळ्यात पाणी यायचे...पण तरीही मला ती पकडायची असायची.....अगदी २ मिनिट ...लगेच काढून घ्यायचा.....खरं तर वाऱ्याच pressure  माझ्या हाताला पेलावायचं पण नाही....पण तरीही ..मला उंच उंच उडणारी पतंगच हवी असायची...कधी कधी अमेय पण त्याची पतंग पकडायला द्यायचा...पण त्याची पतंग फार उंच नाही जायची....मी किती वेळेस त्याची पतंग लांब जाऊन उडी मारून सोड्याचे....पण त्याला ती फार वर उडवताच यायची नाही...दादाला मात्र पतंग कोणी न सोडता अशीच हाताने ओढून भराभर उंच उडवता यायची.....पतंग उडवता येणं हे पण एक skill  च आहे...अनेक वर्ष प्रयत्न करून सुद्धा मला सुरुवातीपासून कधीच पतंग उडवायला जमली नाही.


इकडे खाली आईच्या तिळगुळाच्या पोळ्या सुरु असायच्या..dining  table  वर news  paper  पसरवून त्यावर एक एक पोळी करून आई सगळ्या पोळ्या मांडून ठेवायची. आई केवढ्या तरी पोळ्या करायची.....आणि त्याही न थकता.....आईचा हातच मूळी सढळ होता....एखादा अचानक आलेला पाहुणा सहज accomodate होऊन जायचा....वाढत्या वयातली चार पोर...आम्ही केवढा खायचो तेव्हा...आज विचार करून पण थक्क व्ह्यायला होतं .....आम्ही दिवसभर गुळाच्या पोळ्या खायचो....एक चक्कर kitchen  मध्ये मारली कि सारखं तोंड चालू असायचं...तिळाचे लाडू तरी.....नाहीतर वडी.....नाहीतर.पोळी......बापरे.......आणि येवढा खाउन सुद्धा आम्ही सगळे एकदम बारीक आणि सडसडीत होतो.आईच्या हाताची गुळाच्या पोळ्यांची चव...अहाहा!!! आजसुद्धा जिभेवर रेंगाळते...संक्रांतीला पोळ्या खाउन सुद्धा दुसर्यादिवशी पुरातील एवढ्या पोळ्या असायच्या....तिला कधी स्वयंपाकाचा त्रास झाला नाही आणि ती कधी थकलीहि नाही........एकसारख्या पोळ्या आणि एकसारख्या वड्या...तिची सर कोणालाच नाही..


दुपारची जेवणं झाली कि मग बिल्डिंग मधल्या सगळ्या काकवा आणि मोठ्या ताया पण गच्ची वर यायच्या...आता बायकांची majority  असायची.....आणि आईचं baking असल्यामुळे दादा मला पुष्कळ वेळेस पतंग हातात पकडायला द्यायचा.....दुपारचा हाच तो वेळ असायचा ज्यामध्ये मी माझी पतंग उडवण्याची सगळी इच्छा पूर्ण करून घ्यायचे.



सूर्य जसा पश्चिमेकडे झुकायला लागायचा तसा पोरांचा जीव खाली वर व्हायचा.....नोव्हेंबर, डिसेंबर पासून पतंग उडवायची practice  केलेली असायची...आणि आजचा हा last  day .....उद्यापासून पतंग उडवण्यात ती मजा राहणार नसायची...सगळी मुलं अगदी अंधार पडेपर्यंत पतंग उडवत असायची.. संध्याकाळ झाली कि आम्ही लहान मुलं मात्र आईने दिलेला छान ड्रेस घालून आपापल्या डब्यात तिळगुळ घेऊन तयार होऊन बसायचो.सगळे जमले कि एक एक करत सगळ्यांच्या घरी तिळगुळ द्यायला जायचो. आमच्या कॉलोनी मध्ये एकूण ४४ flats होते...काहीच 2BHK ..बाकी सगळे १BHK.. सगळेच जण मध्यम वर्गीय.....सगळ्यांचा घरचाच तिळगुळ....पण एकमेकांमध्ये खूप बांधिलकी होती....आम्ही अगदी प्रत्येक घरी जायचो....आणि आपल्याला मिळालेला तिळगुळ लगेच तोंडात टाकायचो...डब्यात नाही......काही काही काका आम्हाला chocklate  द्यायचे...infact  आम्ही मुलं येणार म्हणून खास आमच्यासाठी आणून ठेवायचे...काही काही काकूंच्या तिळाच्या वड्या किती tasty  लागायच्या.......अशी हि संक्रांत संपली कि रात्री मन फार उदास व्हायचा....संक्रांत संपली म्हणून...आता पुन्हा पुढच्या वर्षीच हे सगळं अनुभवायला मिळणार हि जाणीव मनाला मात्र फार हुरहुरायला लावायची....


आणि आता....ते सगळं परत कधीच मिळणार नाही......म्हणून हुरहूर.......कायमचीच.......दरवर्षीप्रमाणे मी पुण्यात असते.आणि माझे मन मात्र.......नाशिकला.....२० वर्ष मागे जाऊन बसते एकटेच........